धाराशीव
67 लाखासाठी 24 कोटी रुपयांची कॅथ लॅब सुरु होईना, डीपीडीसी स्थगिती उठवा, मुख्यमंत्री यांना कैलास पाटील यांची मागणी
शासनाने आरोग्याशी संबंधित कामांवरील डीपीडीसी ( जिल्हा नियोजन समिती कामे) स्थगिती तात्काळ उठवावी, आरोग्याच्या विषयात राजकारण नको. 67 लाखाच्या ट्रांसफार्मर व डीजी सेट साठी 24 कोटी रुपयांची कॅथ लॅब सुरु होईना त्यामुळे तात्काळ डीपीडीसी स्थगिती उठवा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये 24 कोटी रुपये खर्चून केलेली कॅथ लॅबचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात आले आहे. ते चालू करण्यासाठी ट्रान्सफरसाठी फक्त 67 लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने डीपीडीसीमध्ये डीजी सेट आणि ट्रान्सफॉर्मरसाठी आवश्यक असणाऱ्या 67 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता 2024 – 25 मध्ये देण्यात आली आहे. परंतु डीपीसीच्या निधीवरील स्थगितीमुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. स्थगितीमुळे डीजी सेट व ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने कॅथलॅबचे 90% काम पूर्ण होऊनही ते वापरात येऊ शकत नाही, ही वस्तुस्तिथी आहे.
शासनाला माझी विनंती आहे की, कमीत कमी जिथे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे तेथे राजकारण न करता काम करावे. कॅथलॅबमुळे हृदयरोगी रुग्णांची अँजिओप्लास्टी देखील या ठिकाणी होऊ शकते. परंतु किरकोळ 67 लाख रुपयांसाठी 24 कोटी रुपये खर्चूनही सुविधा उपलब्ध होत नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे शासनाने आरोग्याशी संबंधित कामांवरील स्थगिती तत्काळ उठवावी, अशी नम्र विनंती आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
औषधे घेण्यासाठीही या स्थगितीचा फटका बसत असून रुग्णांना आवश्यक औषधे उसनवारीवर घ्यावी लागत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहावे, परंतु सर्वसामान्यांच्या जीविताशी संबंधित कामांवर त्याचा परिणाम होऊ नये. आपापसातील मतभेद आणि हेवेदावे हे बाजूला ठेवून, जनतेच्या आरोग्यास प्राधान्य द्यावे, अशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो.
एमआरआय मशीन जे इचलकरंजीला हलविण्यात येणार होते, ते आम्ही स्थानिकांच्यासह केलेल्या विरोधामुळे धाराशिव रुग्णालय परिसरातच मिळाले असून तेही लवकरच सुरू होणार आहे. तसेच, सीसीबीचे 50 बेडचे आयसीयूचे काम अंतिम टप्प्यात आहे. गॅस पाईपलाईन आणि इक्विपमेंट यांची तांत्रिक मान्यता बाकी आहे. त्या अनुषंगाने मी स्वतः पाठपुरावा करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे असे आमदार कैलास पाटील म्हणाले.






