तुळजापुर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप मंगळवारी (३० सप्टेंबर) ‘द फोक आख्यान’ या भव्य लोकसंगीताच्या सादरीकरणाने झाला. २२ सप्टेंबरपासून दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडलेल्या या महोत्सवाने रसिक प्रेक्षकांना मराठी लोककलांचा अद्वितीय अनुभव दिला.
या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये कलाकारांनी मनोरंजन करण्यासोबतच माय मराठीचा जागर करत आपल्या डोळ्यात वास्तवाचं अंजन घालणारे कार्यक्रम गेले नऊ दिवस रंगमंचावर सादर केले. मराठी मातेला आणि मातीला लोककलांचा दैदिप्यमान वारसा आहे. इथं संतांच्या अभंगवाणीने लोकांचं प्रबोधन केलं. वाघ्या मुरळीनं भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. तर शाहिरांच्या पोवाड्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना जागवलं. महाराष्ट्रातील लोककलांना नवसंजीवनी देण्यासाठी गुलाल भंडाऱ्याची उधळण करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले कलाकार एकत्र आले आणि त्यांनी लोककलेचा महोत्सव आपल्या खांद्यावर उचलून धरला. कोणी सूर सोबत आणले. कोणी आपली शब्दसंपदा रीती केली. तर, कोणी या सगळ्यांना एकत्र बांधणारं लोकसंगीताचं सूत्र विणलं.
समारोपाच्या दिवशी सादर झालेले ‘द फोक आख्यान’ हे लोकसंगीत व लोककलेचा संगम ठरले. नव्या पिढीतील कलाकारांनी मराठी संस्कृतीचे जतन-संवर्धन, तसेच पारंपरिक लोक कलावंताप्रति सद्भावना व्यक्त करत लोकसंगीताची अविस्मरणीय मैफल रंगविली. भाव, भावना, सूर, शब्द आणि लय यांचा सुंदर मेळ साधत या आख्यानाने रसिक प्रेक्षकांना लोकसंस्कृतीच्या नव्या वाटा दाखवल्या.
कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त अरविंद बोळंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी स्त्रीशक्तीचा गौरव म्हणून सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लक्ष्मी मोरे यांचा सन्मान करण्यात आला. धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांच्या हस्ते त्यांना श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ, महावस्त्र व अकरा हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, उपविभागीय अधिकारी व मंदिर संस्थानचे विश्वस्त ओंकार देशमुख, तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे, सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक वैजनाथ घोडके, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
शारदीय नवरात्र महोत्सवाने मराठी लोककलेच्या विविध पैलूंना अधोरेखित करत रसिक प्रेक्षकांना रंगतदार प्रवास घडवून आणला.







