अणदूर
अणदूर येथील श्री खंडोबाच्या जागृत देवस्थान परिसरात, भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या गणपतीची संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर नव्या सभामंडपात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पुजारी समाजाच्या जय मल्हार तरुण मंडळाने लोकवर्गणीतून हा सभामंडप उभारला असून, या उपक्रमामुळे आता गावातील या ‘पावणाऱ्या’ गणपतीला कायमस्वरूपी हक्काचे स्थान मिळाले आहे.
श्री खंडोबा मंदिराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर ‘गाईचा वट्टा’ म्हणून ओळखली जाणारी जागा होती. येथील बांधकाम जुने झाल्याने त्याची पडझड झाली होती. याच जागेवर जय मल्हार तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून एक नवीन सभामंडप बांधण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णत्वास नेला.
या गणपतीची एक विशेष परंपरा आहे. गणेशोत्सवामध्ये याच गणपतीची मूर्ती जवळच्या मोकळ्या जागेत मंडप उभारून दहा दिवसांसाठी बसवली जाते. मात्र, परंपरेनुसार या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. उत्सव संपल्यानंतर इतके दिवस ही मूर्ती इंदाई मंदिरात ठेवली जात होती. आता या नव्या सभामंडपामुळे या मानाच्या गणपतीला कायमस्वरूपी जागा मिळाली आहे.
संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून, आज मंडळाचे तरुण कार्यकर्ते ज्ञानेश्वर शशिकांत मोकाशे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते या गणपतीची विधिवत पूजा करून नव्या जागेत प्रतिष्ठापना करण्यात आली. अणदूर गावात हा गणपती ‘मानाचा आणि पावणारा गणपती’ म्हणून ओळखला जातो, आणि या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
गणपती शेजारी प्रभू श्रीरामाची जुनी दगडी मूर्तीची देखील प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, यामुळे गणपती बरोबर प्रभू श्रीरामाचे दर्शन भाविकांना होणार आहे.






