पुणे
कार्यसिद्धी प्रतिष्ठान व गिरीराज सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘कार्यसिद्धी महाआरोग्य शिबिर’ च्या उद्घाटनप्रसंगी माझे मनोगत व्यक्त करताना, मला माझ्या आरोग्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील काही ऐतिहासिक आणि जनकल्याणकारी निर्णयांची व उपक्रमांची आठवण झाली, ज्याची नोंद आज जागतिक स्तरावर झाली आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो!
माझ्या आरोग्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात राज्यात चार कोटींहून अधिक महिलांची तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया या “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानांतर्गत करण्यात आली. मी आज अभिमानाने सांगू इच्छितो की, हेच अभियान देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या स्वरूपात देशभरात मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. आपल्या राज्यातील संकल्पना संपूर्ण देशात रुजणे, हा महाराष्ट्रासाठी आपल्यासाठी गौरवाचा क्षण आहे!
महाराष्ट्राच्या वारी परंपरेतील लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याच्या हेतूने “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” हा उपक्रम सलग तीन वर्षे राबविण्यात आला. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या उपक्रमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद देखील झाली आहे.
आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी आणि महाराष्ट्राला १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे योगदान देण्यासाठी, राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ असणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते. यासाठीच आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, पण कोणीही आरक्षणासाठी आत्महत्या करू नये, हे माझे कळकळीचे आवाहन आहे. आत्महत्या हा पर्याय नाही, आरक्षण नक्की मिळेल. आम्ही आजपर्यंत आत्महत्या केलेल्या मराठा, धनगर, ओबीसी शेकडो तरुणांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, मुलांचे शिक्षण, नोकरी व विवाहासाठी सहाय्य करत आहोत. यात कोणतेही राजकारण नाही, हा केवळ सेवाभाव आहे.
मी आजपर्यंत ४०० ते ५०० मुलांना दत्तक घेतले असून, त्यांच्या शिक्षण आणि नोकरीपर्यंतचा सर्व खर्च आणि काळजी आम्ही घेत आहोत.
गिरीराज सावंत यांनी 3 वर्षांपासून कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे शहरातील बेघर लोकांसाठी ‘भुकेल्याचा घास’ हा उपक्रम सुरू केला. यातून दररोज ५०० ते ७०० जेवणाचे डबे दिले जातात आणि आजवर जवळपास 2 लाख लोकांना जेवण देण्यात आले आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आमच्या ‘भैरवनाथ शुगर’ संस्थेच्या माध्यमातून वैयक्तिक मदत करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी ३१,००० कोटींचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर केल्याबद्दल सरकारचे आभार!
मी यानिमित्ताने दक्षिण पुणे, धनकवडी येथील नागरिकांना आवाहन करतो की, या दोन दिवसीय कार्यसिद्धी महाआरोग्य शिबिरात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. भविष्यात कोणत्याही उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी आर्थिक गरज लागल्यास, मी व्यक्तिशः भैरवनाथ शुगर आणि जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मदत करण्याचा शब्द देतो!
याप्रसंगी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.शंकरशेठ जगताप, माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, बाळाभाऊ धनकवडे, विशाल भाऊ तांबे, देविदासजी शेलार, तुषार पाटील, रावसाहेब कुंजीर व दक्षिण पुण्यात कार्यरत सन्माननीय लोकप्रतिनिधी, मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.






