धाराशिव
शासकीय नोकरीमुळे जीवनाला स्थैर्य लाभते,तसेच जनतेची सेवा करण्याची संधी मिळते.याच शासकीय नोकरीसाठी अनेक युवक-युवती स्पर्धा परीक्षा देऊन परिश्रम घेत असतात.मात्र,सर्वांनाच त्या परीक्षेत यश मिळतेच असे नाही.धाराशिव येथील युवक विशाल रामलिंग बिराजदार यांची कहाणी याचेच उदाहरण आहे.
विशालचे वडील भूम येथील दुग्धशाळेत कार्यरत असताना २१ डिसेंबर २०१३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.त्यानंतर कुटुंबातील भावंडांनी अनुकंपा तत्वावर विशालला नोकरी द्यावी, अशी विनंती दुग्धशाळा कार्यालयाकडे आणि प्रशासनाकडे केली.या मागणीचा पाठपुरावा जवळपास १२ वर्षे सतत करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये राज्यातील अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.त्यानुसार विशाल बिराजदार यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि ४ ऑक्टोबर २०२५ रोजी धाराशिव येथे आयोजित जिल्हा रोजगार मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आला.विशाल यांनी जिल्हा कोषागार कार्यालय,धाराशिव येथे लिपिक-टंकलेखक या पदावर रुजू होऊन शासकीय सेवेत प्रवेश केला आहे.यामुळे जीवनात स्थैर्य आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
विशालचे मोठे भाऊ पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करीत असून विवाहानंतर पुण्यात स्थायिक झाले आहेत.विशालने देखील वाहन चालविण्याचा परवाना काढून पुणे येथे खाजगी कंपनीत वाहन भाड्याने चालवण्याचे काम सुरू केले होते. महिन्याला २५ ते ३० हजार रुपये मिळत असले तरी खाजगी नोकरीत कायमस्वरुपाची हमी नसल्याची जाणीव त्याला होती.त्यामुळेच तो सातत्याने अनुकंपा तत्वावरील शासकीय नोकरीसाठी प्रयत्नशील होता.दरम्यान,शासकीय नोकरी मिळावी म्हणून तो दुग्धशाळा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत राहिला.वर्षानुवर्षे कागदपत्रांचा पाठपुरावा केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयामुळे त्याला वडिलांच्या जागी शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले.
या शासकीय नोकरीमुळे आता त्याला व कुटुंबाला चांगले जीवन जगण्याची संधी मिळाली आहे.दोन्ही मुलींना योग्य शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवावे हे माझे स्वप्न असल्याचे विशाल यांनी सांगितले.शासकीय नोकरीमुळे आता ते पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे,अशी भावना विशाल बिराजदार यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हे शक्य झाल्याचे सांगून विशालने राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.






